अवसरी : श्रीनाथ न्यूज वृत्त
बेडसिंग (ता इंदापूर) येथील खडी क्रेशरच्या गौण खनिज उत्खननाच्या खाणीमध्ये घेतल्या जाणाऱ्या ब्लास्ट च्या हादऱ्यामुळे अवसरी व परिसरातील घरांना तडे जात असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. बेडसिंग नजीक काही स्टोन क्रेशर चालत आहेत. या स्टोन क्रेशर च्या उत्खननासाठी ब्लास्टिंग केले जात असून त्याचे मोठे हादरे परिसराला जाणवत आहेत. त्याची तीव्रता एवढी असते की त्यामुळे बेडसिंग, अवसरी गलांडवाडी नंबर २ या गावच्या काही नागरिकांच्या घराला तडे जात आहेत.
सततच्या बसणाऱ्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच क्रेशरमधून निघणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे परिसरातील शेतीवर दुष्परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार वाढत असून लोक त्रस्त झाले आहेत.
घराला तडे गेल्याने राहती घरी धोकादायक झाली आहेत. त्यामुळे येथील काही घरमालक स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. अवसरी येथील दत्तात्रेय मोरे यांच्या स्लॅबला हादऱ्याने छताचे तुकडे पडत आहेत. त्यामुळे अशा घरात वास्तव्य करणे धोकादायक बनले आहे कधीही अचानक स्लॅबचे तुकडे पडत असल्याने ते चिंतेत आहेत. अवसरी येथीलच सोपान माने यांच्या घराच्या भिंतीला हादऱ्यामुळे मोठ्या भेगा पडल्या असून भिंत कधीही ढासळू शकते अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मोठ्या हादऱ्यामुळे परिसरातील भूगर्भातील जलस्रोतावरही परिणाम होण्याची शक्यता लोकांमधून वर्तवली जात आहे. या सर्व बाबीकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून दखल घेऊन या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.